इंद्रियातीत

आपल्याकडे अध्यात्म विषयक ग्रंथांमध्ये ‘इंद्रियातीत’ ही संज्ञा अनेकदा आढळते. विश्वातील परम अविनाशी तत्त्वाचे वर्णन करताना ‘परमात्मा इंद्रियातीत आहे’ असे वाचावयास मिळते. ‘ज्ञानेंद्रिये’ या संकल्पनेबद्दल आपण शाळेत असताना अगदी प्राथमिक इयत्तांमध्ये शिकलो आहोत. पण जेव्हा आपण इंद्रियातीत असे म्हणतो, तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ असा होतो ‘इंद्रियांच्या पलिकडील’. त्या अनुषंगाने साहजिकच येथे काही प्रश्न निर्माण होतात कि, या संज्ञेतील इंद्रिये म्हणजे नक्की कोणती? आणि या इंद्रियांच्या पलीकडे असणारे म्हणजे नक्की काय? याच प्रश्नांचा मागोवा घेणारा हा संक्षिप्त लेख!

इंद्रियातीत या संज्ञेत दोन उपसंज्ञा आहेत – इंद्रिय आणि अतीत. त्यातील प्रत्येक संज्ञेचा थोडक्यात विचार करूयात. भारतीय तत्त्वविचारानुसार निसर्गाने मनुष्याला पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये अशी दोन प्रकारची इंद्रिये बहाल केली आहेत. पंच ज्ञानेंद्रिय समुहात डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा यांचा समावेश होतो. ही ज्ञानेंद्रिये सृष्टीतील प्रत्येकी एका गुणाचे ज्ञान आपल्याला  करून देतात. डोळ्यांनी आपण पाहतो, अर्थात ‘रूप’ या गुणाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांनी होते. कानांनी आपण ऐकतो, म्हणून ‘शब्द’ या गुणाचे ज्ञान आपल्याला कान करून देतात. आपण नाकाने वास घेतो, म्हणजेच नाकाने आपल्याला ‘गंध’ हा गुण समजतो. जिभेवर पदार्थ ठेवल्यावर क्षणात त्याची चव आपल्याला कळते, कारण ‘रस’ या गुणाचे ज्ञान जीभेमुळे होते. त्वचा आपल्याला ‘स्पर्श’ या गुणाशी अवगत करते. थोडक्यात, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांमुळे आपल्याला अनुक्रमे रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श या गुणांचे ज्ञान होते, म्हणून त्यांना आपण ज्ञानेंद्रिये असे संबोधतो. तर, पंच कर्मेंद्रिय या समुहात हात, पाय, वाणी, गुद आणि उपस्थ अशा पाच इंद्रियांचा समावेश होतो.

‘गीतारहस्य’ या सुप्रसिद्ध ग्रंथात लोकमान्य टिळकांनी मानवी शरीराची तुलना कारखान्याशी केली आहे. ते लक्षात घेतल्यास या इंद्रियांचे आपल्या शरीरातील कार्य समजायला सोपे जाईल. कारखाना म्हटला कि त्यात मुख्यतः तीन घटकांचा समावेश होतो: कच्चा माल (Input), त्यावरील प्रक्रिया (Process) व त्यापासून तयार झालेला पक्का माल (Output). आपल्या शरीराच्या कारखान्यातसुद्धा हे तीन घटक अव्याहत कार्यरत असतात. ज्ञानेंद्रिय या कारखान्यात कच्चा माल पुरवतात. मन व बुद्धी त्यावर प्रक्रिया करतात आणि कर्मेंद्रिय कारखान्यात तयार झालेला माल बाहेर पाठवण्याचे कार्य करतात. ज्ञानेंद्रिये ही कारखान्याला ज्ञान पोचवणारी, तर कर्मेंद्रिये कर्म प्रकट करणारी द्वारे आहेत.

एखादं उदाहरण बघुयात म्हणजे मग या शरीररूपी कारखान्याची कार्यपद्धती आपल्या लगेच लक्षात येईल. समजा, आपण रस्त्याने जात आहोत व तेवढ्यात आपल्याला गरमागरम बटाटे वड्यांचा वास येतोय. साहजिकच आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि मग त्या गाडीवर जाऊन आपण वड्यांवर यथेच्छ ताव मारतो. हा प्रसंग आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला असेल. या उदाहरणामध्ये आता कारखान्याचे रूपक जोडून पाहण्याचा प्रयत्न करूयात. रस्त्याने जात असताना बाजूला असणाऱ्या बटाटे वड्यांच्या गाडीचे ज्ञान आपल्याला कसे झाले? तर, आपल्या नाकाने वड्यांचा वास घेतला (गंध गुण), थोडं पुढे गेल्यावर ती गाडी प्रत्यक्ष नजरेस पडली (रूप गुण). म्हणजेच आपली ज्ञानेंद्रिये कार्यरत झाली आणि त्यांनी ज्ञानरुपी कच्चा माल कारखान्यात पाठवला. मग आपल्या मनाला वड्यांचा वास आवडला आणि बुद्धीने ते खाण्याचा निर्णय घेतला, ही झाली प्रक्रिया. एकदा निर्णय झाल्यावर आपले ‘पाय’ नकळत त्या गाडीकडे वळले आणि ‘हातां’नी वडे उचलून आपण ‘तोंडा’ने त्या वड्यांवर ताव मारला. म्हणजेच येथे आपली कर्मेंद्रिये कार्यरत होऊन बुद्धीने ठरवेलेले कार्य त्यांनी प्रत्यक्ष प्रकट केले.

इंद्रियांचा तपशीलवार विचार करून आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया. ‘इंद्रियांच्या पलीकडे’ म्हणजे नेमके काय? याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करूयात. वरती म्हटल्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये आपल्याला सृष्टीतील पाच गुणांचे ज्ञान करून देतात. आता असा विचार करूया कि, समजा मनुष्याला डोळेच नसते तर काय झाले असते? अर्थातच आपल्याला काही दिसले नसते. म्हणजेच आपल्याला ‘रूप’ या गुणाचे ज्ञान झालेच नसते. त्या गुणापासून आपण कायमचे वंचित राहिलो असतो. थोडा आणखी विचार केला, तर आपल्या हे सहज ध्यानात येईल कि, मनुष्याला पाच ज्ञानेंद्रिये असल्याने त्याला सृष्टीतील केवळ पाचच गुणांचे ज्ञान होते. त्याहून अधिक गुण जरी या सृष्टीत असले, तरी त्याचे ज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. कारण आपल्या कारखान्याला कच्च्या मालासाठी केवळ पाचच दरवाजे आहेत. ही मानवी शरीराची मर्यादा आहे. आता असे पहा, नागाला ऐकू येत नाही. त्याच्याकडे श्रवणशक्तीचा अभाव आहे. नागासाठी ‘शब्द’ हा गुण अस्तित्वातच नाही. पण सत्य तसे नाही. सृष्टीत शब्द गुण उपस्थित आहे, परंतु शरीराच्या मर्यादेमुळे नागाला त्याचे ज्ञान होत नाही. त्यामुळेच नागाकरिता शब्द हा गुण ‘इंद्रियातीत’ झाला. या अनादि अनंत सृष्टीत एखादा असा पदार्थ, एखादे द्रव्य किंवा एखादे तत्त्व असे असू शकते कि ज्यामध्ये रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श याव्यतिरिक्त अन्य काही गुण आहेत, परंतु त्याचे ज्ञान मिळवण्याची मानवी शरीराची क्षमताच नाही. मग शेवटी आपल्याला असेच म्हणावे लागते, कि असे तत्त्व ‘इंद्रियातीत’ म्हणजेच या ज्ञानेंद्रियांच्या पाच गुणांच्या पलीकडले आहे.

निसर्गातील सर्वात हुशार प्राणी म्हणून माणूस ओळखला जातो. आदिमानव हळूहळू उत्क्रांत होत गेला. त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांची वृद्धी झाली. असे असले तरी, ज्ञानेंद्रियांची संख्या तेव्हाही पाच होती व आजही पाचच आहे. आदिमानवाला निसर्गातील पाच गुणांचे ज्ञान व्हायचे आणि आजही आपल्याला फक्त पाचच गुणांचे ज्ञान होते. सहावा गुण जरी अस्तित्वात असला तरी तो जाणून घेण्यास आपण असमर्थ आहोत. त्यामुळे आपण कितीही प्रगत झालो, तरी आपल्याला सदैव मर्यादा असणार. या अनादी निसर्गापुढे मनुष्य प्राणी क्षुद्रच ठरणार. मानवी शरीराची ही मर्यादा लक्षात आली कि आपोआपच या शरीराचा मोह कमी होतो, ‘इंद्रियातीत’ असणाऱ्या तत्त्वाचा ध्यास लागतो आणि आपली अध्यात्मिक मार्गावर वाटचाल सुरु होते…..

4 thoughts on “इंद्रियातीत

  1. भावना ही कोणत्या प्रकारात मोडते? ज्ञानेंद्रिये कि कर्मेंद्रिये?

    Like

  2. आयुर्वेदानुसार ५ ज्ञानेंद्रिय, ५ कर्मेंद्रिय आणि मनाला उभयेन्द्रिय (दोन्ही एकत्रितपणे) म्हणतात. त्यादृष्टीने भावना हे इंद्रियार्थ मनाच्या आधीन आहे असे मला वाटते. श्री. नवरे यांचा सदर विषयात अधिक अभ्यास आहे. त्यामुळे माझे काही चुकत असेल तर ते त्यांच्याकडून जाणून घ्यायाल नक्कीच आवडेल.
    डॉ. संतोष जळूकर (मुंबई)

    Like

  3. भावना म्हणजे अंतःकरणात उमटलेले तरंग. आपल्याकडे अंतःकरणाची चार अंगे सांगितली आहेत. त्यात मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा समावेश होतो. चित्ताची तुलना जलाशयाशी केली आहे. चित्त जलरूपी आहे. इंद्रियांच्या बाह्यसृष्टीतील विषयांच्या संयोगाने आपल्या अंतरंगात तरंग निर्माण होतात. चित्ताच्या शांत जलाशयावर उमटणारे हे तरंग म्हणजेच भावना असे मला वाटते. त्यामुळे डॉ. जळूकर यांचे म्हणणे अत्यंत संयुक्तिकच आहे.

    Like

Leave a comment