मनसस्तु परा बुद्धिः

काल टीव्ही वर एक जाहिरात पाहत होतो. लहान मुलांच्या बुद्धीचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होत असतो व हा विकास अधिक चांगल्या रीतीने होण्यासाठी ० ते ५ वयोगटातील मुलांना दुधात अमुक पावडर घालून द्यावी, असे काहीतरी सांगणारी ती जाहिरात होती. त्यावरून मला आठवलं कि मलासुद्धा आई लहानपणी बदाम वगैरे तत्सम पदार्थ खायला देत असे, त्यामुळे मीही बुद्धिमान होईन, अशी तिची वेडी आशा होती. या पदार्थांमुळे मा‍झ्या बुद्धीचा विकास झाला कि नाही हा संशोधनाचा विषय आहे, परंतु मला विविध पदार्थ खाण्याची आवड लागली एवढं खरं! एकंदरीत काय तर आपल्याकडे ‘बुद्धी’ या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. अशा या ‘मान्यवर’ दर्जा प्राप्त झालेल्या बुद्धीचे कार्य कोणते? जर बुद्धी निर्णय घेत असेल असे मानले, तर काही लोक ‘मनाने निर्णय घेतात’ म्हणजे नेमके काय करतात? बुद्धीचे काही प्रकार आहेत का? मा‍झ्या अत्यंत अल्प बुद्धीला पडलेल्या या प्रश्नांचा मागोवा घेणारा हा संक्षिप्त लेख!

आदि शं‍कराचार्यांनी सांगितलेल्या अंतःकरण-चतुष्टय मधील ‘मन’ या इंद्रियाचा विचार आपण मागील लेखात केला. आवड-निवड ठरविणाऱ्या व वकीलाप्रमाणे वागणाऱ्या मनाचे कार्य आपण पहिले. याच अंतःकरण चतुष्टय मधील दुसरे महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे ‘बुद्धी’. हे इंद्रिय मनाहून श्रेष्ठ दर्जाचे मानले गेले आहे. अनेकविध अध्यात्मिक ग्रंथांत बुद्धीची श्रेष्ठता ग्रंथकारांनी विशद केली आहे. भगवद्गीतेच्या तिसर्‍या अध्यायातील ४२व्या श्लोकात दिलेल्या क्रमवारीनुसार बुद्धी ही मन व इंद्रिये याहून श्रेष्ठ दर्जाची व अधिक सूक्ष्म आहे. महाभारतातील शांतिपर्वातील एका श्लोकात ‘व्यवसायत्मिका बुद्धिः’ असे बुद्धीचे वर्णन आढळते. यावरून बुद्धीचे कार्य स्पष्ट होते. श्लोकात म्हटल्याप्रमाणे बुद्धी हे व्यवसाय करणारे इंद्रिय आहे. व्यवसाय या शब्दाचा येथील अर्थ म्हणजे सारासार विचार व निर्णय. बुद्धीकडे निवडानिवड करण्याची शक्ती आहे. म्हणजेच काय, तर एखादे कार्य करावे कि करू नये याचा निर्णय बुद्धी करते.

बुद्धीचे काम न्यायाधीशासारखे आहे. ज्याप्रमाणे वकिलाने मांडलेल्या बाजू ऐकून घेऊन त्यावर योग्य निर्णय सुनावण्याचे कार्य न्यायाधीश करतात, अगदी तसेच मनाने मांडलेल्या विषयांवर सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे काम बुद्धी करते. उदाहरणार्थ, आपण एखाद्या मोबाईलच्या दुकानात जातो, तिथे स्वस्त-महाग असे अनेक प्रकारचे मोबाईल ठेवलेले असतात. त्यातील काही मोबाईल आपल्या मनास भावतात. मग आपले मन त्याची बाजू बुद्धीसमोर मांडते व त्यावर सारासार विचार करून अखेरीस कोणता मोबाईल घ्यावा, याचा निर्णय बुद्धी करते. म्हणजेच काय, तर कोणत्याही गोष्टीबाबत निर्णय घेण्याचे कार्य बुद्धीचे आहे.

आपल्याकडे काही जण असं म्हणताना दिसतात कि, ‘हम दिमागसे नाही, दिलसे फैसला करते है’. अशा प्रकारच्या विधानातून काही प्रश्न निर्माण होतात. निर्णय घेणे बुद्धीचे काम असल्यास मनाने निर्णय घेणे म्हणजे काय? बुद्धीने निर्णय घेणे म्हणजे भावना-शून्य होऊन निर्णय घेणे, असे आहे का? या प्रश्नमालिकेच्या उत्तरासाठी आपण एका तराजूची कल्पना करूयात. तराजूच्या एका पारड्यात आपली इंद्रिये व त्यांचे विषय आहेत, तर दुसर्‍या पारड्यात बुद्धी आहे. या तराजूच्या मध्यभागी मन विराजमान आहे. मनाचे दान ज्या पारड्यात पडेल ते पारडे जड होईल व त्याची आपल्यावर सत्ता प्रस्थापित होईल. जेव्हा मन आपले दान बुद्धीच्या पारड्यात टाकते, तेव्हा आपण अधिक विवेकनिष्ठ होतो. यामध्ये भावनांना स्थान नसते, हा केवळ गैरसमज आहे. भावना महत्वाच्या आहेतच, परंतु त्यांच्या सर्वस्वी आहारी न जाता सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरून आपण निर्णय घेतो. परंतु, जेव्हा मनाचे दान इंद्रिय व विषयांच्या पारड्यात पडते, तेव्हा साहजिकच आपण विषयाधीन होतो. आपल्या बुद्धीवर विषयांची सत्ता प्रस्थापित होते. आपला सारासार विचार क्षीण होतो. इंद्रिय-विषय व त्यातून मनात निर्माण होणार्‍या भावना यांची आपल्यावर सत्ता प्रस्थापित होते. अशा वेळी आपण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो व म्हणतो कि ‘हम दिलसे फैसला करते है!’.

भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात श्रीकृष्णाने बुद्धीचे प्रकार वर्णिले आहेत. बुद्धीचे मुख्यतः तीन प्रकार पडतात: सात्त्विक बुद्धी, राजसिक बुद्धी व तामसिक बुद्धी. ज्या बुद्धीला योग्य-अयोग्य कळते, कर्तव्य व नीतीधर्म कळतो, अशी बुद्धी म्हणजे सात्त्विक बुद्धी. जी बुद्धी धर्म-अधर्म, कर्तव्य-अकर्तव्य योग्य रीतीने जाणत नाही, ती राजसिक बुद्धी. जी बुद्धी अधर्मालाच ‘धर्म’ मानते व विपरीत निर्णय करते, ती तामसिक बुद्धी. उदाहरणार्थ, महाभारतात दुर्योधनाची बुद्धी तामसिक होती, त्यामुळेच अधर्म करण्यातच त्याला पुरूषार्थ वाटला. कुरुक्षेत्र युद्धापूर्वी अर्जुनाची बुद्धी राजसिक होती, त्यामुळे त्याला योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म याचा विसर पडला व त्याने शस्त्रत्याग केला. परंतु, श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुनाला स्वधर्माची जाणीव झाली व तो युद्धास तयार झाला, ही झाली सात्त्विक बुद्धी.

कठोपनिषदामध्ये उद्दालक ऋषींचा सुपुत्र नचिकेत व यमदेव यांच्यातील संवाद आहे. यामध्ये यमदेव नचिकेताला ब्रह्मविद्येचा उपदेश करतात. या रंजक संवादामध्ये यमदेवांनी मानवी शरीराला रथाची उपमा दिली आहे. इंद्रिये म्हणजे या रथाचे अश्व. ती स्वाभाविकपणे विषयांकडे धाव घेत असतात. या घोड्यांना लगाम आहे तो मनाचा. मनच या इंद्रियांना आवरू शकते, त्यांना आवर घालू शकते. या रथाचा सारथी म्हणजे बुद्धी. मनाचा लगाम बुद्धीच्या ताब्यात आहे. म्हणजेच मन हे बुद्धीच्या आधीन आहे व इंद्रिये मनाच्या आधीन आहेत. बुद्धी या शरीररथाचे सारथ्य करते व रथाला योग्य दिशादर्शन करते. या रथाचा स्वामी आहे आत्मा (अध्यात्मिक परिभाषेत त्याला ‘जीवात्मा’ अशी संज्ञा आहे). शरीररूपी रथातून त्याचा स्वामी या संसारात प्रवास करत आहे. रथाचा मार्ग कोणता व कसा असावा, हे सारथी ठरवतो. सारथीने लगाम घट्ट पकडून रथाच्या अश्वांना आपल्या काबूत ठेवले पाहिजे, तरच हा रथ योग्य मार्गाने प्रवास करील. अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण स्वतः सारथी होते, म्हणून त्यांचा रथ निजधामाला पोचला. आपणही जर स्वतःला अर्जुनाच्या योग्यतेचे बनवले, तर कोण जाणे, आपल्याही रथावर भगवान स्वतः विराजमान होतील व आपला रथ पैलतटावर घेऊन जातील!

मनाचिये गुंती

गेले काही दिवस कामाच्या इतर व्यापामुळे लिखाण मागे पडलं. मनासारखं काही सुचत नव्हतं. सुचलेलं मनाला आवडत नव्हतं. पण मी अगदी मनापासून ठरवलंच कि आता लिहायचंच आणि निग्रहाने लिहायला बसलो. लिहायला वेळ काढला, पण विषय सापडत नव्हता. कारण, सुचणं – न सुचणं हे सगळे मनाचे खेळ.. पण शेवटी मनानेच मला विषय सुचवला. मनावर लिहिण्याचा! वरील वाक्यात अनेकदा ‘मन’ या संज्ञेचा उपयोग झाला. इतकी दैनंदिन वापरातील संज्ञा असूनही आपल्याला मनाविषयी अनेक प्रश्न पडतात. मन हे इंद्रिय शरीरात नेमकं कुठे आहे? त्याचे काम काय? मन भावना निर्माण करते का? असे एक ना अनेक मनाविषयीचे प्रश्न मनात येत असतात. वरवर सोपे दिसत असले तरी, हे प्रश्न मोठे गुंतागुंतीचे आहेत. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा छोटासा प्रामाणिक प्रयत्न!

मागील लेखात आपण मानवी शरीरातील पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यांची माहिती घेतली. ती इंद्रिये आपल्या डोळ्यांना दिसतात, म्हणजेच ती प्रकट स्वरुपात (manifested) असतात. त्यांना स्थूल इंद्रिये  म्हणून संबोधले जाते. परंतु त्याखेरीज निसर्गाने आपल्याला काही अप्रकट स्वरुपातील (subtle) अर्थात सूक्ष्म इंद्रिये प्रदान केली आहेत. जसे कि, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इत्यादी. विवेक-चूडामणि या ग्रंथात आदि शं‍कराचार्यांनी मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांना अंत:करण-चतुष्टय असे संबोधले आहे. या अंत:करण समूहातील प्रत्येक सूक्ष्म इंद्रियावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. त्यामुळे त्यातील केवळ ‘मन’ या इंद्रियाचा विचार आपण या लेखात करणार आहोत.

मनाचे स्थान नेमके कोणते याचा विचार केल्यास त्याचे कार्य काय याचाही किंचित उलगडा होऊ शकतो. मनाच्या स्थानाचे थेट वर्णन भगवद्गीतेत सापडते. गीतेतील तिसर्‍या अध्यायातील ४२व्या श्लोकात सूक्ष्म इंद्रियांची क्रमवारी (hierarchy) वर्णन केली आहे. क्रमवारीत सर्वात निम्न स्तरावर इंद्रिये आहेत. त्यांचे कार्य सर्वात कनिष्ठ दर्जाचे असते. मन हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. मनाहून श्रेष्ठ बुद्धी आहे, तर त्याहून आत्मा सर्वश्रेष्ठ आहे. या क्रमवारीत आत्म्याचे स्थान सर्वोच्च आहे. म्हणजेच, मनाचे स्थान इंद्रिये व बुद्धी यांच्या दरम्यान आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘मन हे इंद्रिय व बुद्धी यांना जोडण्याचं काम करते. तराजूची कल्पना केल्यास, पारड्यात एका बाजूला इंद्रिये, तर दुसर्‍या बाजूला बुद्धी असते व तराजूच्या बरोब्बर मध्यभागी मन असते.’ यावरून आपण इतका अंदाज लावू शकतो कि, मनाचे कार्य इंद्रियांहून श्रेष्ठ दर्जाचे परंतु बुद्धीशी तुलना करता कमी दर्जाचे आहे.

मनाचे काम समजून घेण्यासाठी आपल्याला मनाबरोबरच इंद्रिये व बुद्धी यांचाही विचार करावा लागेल. इंद्रिये बहिर्मुख असतात. भौतिक सृष्टीतील निरनिराळ्या गोष्टींशी इंद्रियांचा संपर्क येतो. बाह्य सृष्टीतील या गोष्टींनाच ‘विषय’ असे संबोधतात. या विषयांशी संबंध आल्यावर ज्ञानेंद्रिये त्याची माहिती मनाला देतात. त्यावरून मन आवड – निवड ठरवते. या आवडी-निवडीनुसार मन ती माहिती बुद्धीसमोर मांडते. तर्काला अनुसरून बुद्धी त्यावर कर्म – अकर्माचा (एखादी क्रिया करावी कि करू नये याचा) निर्णय घेते व तो मनाला सांगते. बुद्धीने दिलेल्या निर्णयानुसार मन इंद्रियांकडून कार्य करवून घेते. महाभारतातील शांतिपर्वात एका श्लोकात मन व बुद्धीचे वर्णन करताना म्हटले आहे, “व्यवसायात्मिका बुद्धिः मनो व्याकरणात्मकम्”. अर्थात, बुद्धी ही सारासार विचार करणारी (व्यवसायात्मक), तर मन हे विस्तार करणारे (व्याकरणात्मक) आहे.

एक उदाहरण घेऊन आपण वरील प्रक्रिया समजून घेऊयात. समजा, आपण जेवायला बसलो आहोत. ताटात विविध पदार्थ वाढले आहेत. त्यात वांग्याची भाजीसुद्धा आहे. वांग्याची भाजी म्हणजे एक विषय. ही वांग्याची भाजी आपल्याला डोळ्यांना दिसते, नाकाने त्याचा वास येतो, जि‍भेला चव कळते. म्हणजेच बाह्य जगातील विषयाची माहिती आपल्या इंद्रियांना झाली. ती माहिती त्यांनी मनाला पोचवली. परंतु, मनाला ती भाजी आवडत नाही. आवडी-निवडीनुसार मनाने आपली बाजू बुद्धीसमोर मांडली. लोकमान्य टिळकांनी मनाला वकिलाची, तर बुद्धीला न्यायाधीशाची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे वकील आपली बाजू न्यायाधीशासमोर मांडतो, त्याप्रमाणे मन आपली बाजू बुद्धीसमोर मांडते. त्यावर बुद्धी आपला निर्णय सुनावते कि, प्रकृतीकरिता वांग्याची भाजी चांगली असल्याने ती खाणे आवश्यक आहे. न्यायाधीशांनी निर्णय दिल्यानंतर मन इंद्रियांच्या सहाय्याने त्याची अंमलबजावणी करते. म्हणजेच, आपण सारासार विचार करून नावडीने का होईना, पण ती वांग्याची भाजी खातो व खाताना नकळत म्हणतो, “ही भाजी मला मनापासून आवडत नाही”. कारण आवड-निवड करण्याचे काम आपल्या मनाचेच असते! ही प्रक्रिया पाहता आपल्या लक्षात येईल कि मनाने येथे विस्तारात्मक कार्य केले. इंद्रियांनी ग्रहण केलेले विषय मनाने बुद्धीसमोर विस्तारपूर्वक मांडले व बुद्धीने दिलेला निर्णय इंद्रियांसमोर मांडला. म्हणून मनाला ‘व्याकरणात्मक’ असे म्हटले आहे.

बोलताना आपण सहजच म्हणतो, कि माझ्या मनात अमुक भावना निर्माण झाली. याचे कारण भावना म्हणजे मनावर निर्माण झालेले तरंग. मन हे पाण्यासारखे प्रवाही असते. इंद्रियांचा जेव्हा बाह्य विषयांशी संयोग होतो, तेव्हा त्याचे मनावर तरंग निर्माण होतात. हे निर्माण झालेले तरंग म्हणजेच भावना. स्थिर पाण्यात छोटासा खडा मारला तरी, त्यातून असंख्य तरंग निर्माण होतात. अगदी तसेच, इंद्रियांचा विषय-संयोग झाला कि आपल्या मनात अगणित भावभावनांचे तरंग उमटतात. जे विषय मनाला आवडीचे असतात, ते हवेहवेसे वाटतात, त्यालाच आसक्ती असे म्हणतात. ते मिळवण्यासाठी मनाची धडपड सुरु होते. याउलट जे विषय नावडीचे असतात, ते टाळण्यासाठी मन प्रयत्न करते. एकंदरीतच, मनाची अशी अविरत हालचाल झाली कि त्याचे असंख्य तरंग अर्थात भावना निर्माण होतात.

आपल्याकडे चार वेद प्रसिद्ध आहेत. या वेदांचा अभ्यास करण्यासाठी पूरक अशी सहा वेदांगे म्हटली आहेत. शिक्षा (वेदांच्या पाठांचे योग्य उच्चारण करण्याचे शास्त्र), कल्प (यज्ञयाग आदिसंबंधी माहिती), व्याकरण (शब्दसाधन व शब्दप्रयोग यासंबंधीचे नियम), निरुक्त (वैदिक शब्दकोष), छंद (वैदिक छंद व त्यासंबंधीची विद्या) व ज्योतिष (ग्रह-नक्षत्रे यांची स्थिती-गती, व त्याचा मानवी जीवनावर होणार्‍या परिणाम यासंबंधीचे शास्त्र) अशी ही सहा वेदांगे आहेत. यांच्या अभ्यासानंतरच वेदांचा अभ्यास करता येतो व त्यातील ज्ञानप्राप्ती होऊ शकते. या वेदांगातील एक प्रमुख अंग असणार्‍या ज्योतिषशास्त्रात ‘चंद्र’ या ग्रहाला (ज्योतिषशास्त्रातील ‘ग्रह’ या संज्ञेची व्याख्या खगोलशास्त्रातील ग्रहापेक्षा पूर्णतः भिन्न आहे) मनाचा कारक मानले आहे. कारण चंद्र हा आकाशातील सर्वात गतिमान ग्रह आहे. तसेच चंद्र हा ‘जल’तत्त्वाचा ग्रह आहे. प्रवाहिता हा पाण्याचा अंगभूत गुण आहे. त्यामुळे मनाला पाण्याचीच उपमा दिली आहे. हे पाणी विषय संयोगांमुळे सदैव अस्थिर असते. परंतु, मनाला बुद्धीच्या अधीन केले, बुद्धीच्या ताब्यात ठेवले तर, आपली विषयांची आसक्ती कमी होते. परिणामी, मनाचे पाणी स्थिर होऊ लागते. अशी स्थिरता प्राप्त झाल्यावरच आपल्याला ‘मी खरा कोण’ या प्रश्नाचे उत्तररुपी प्रतिबिंब या पाण्यात दिसू शकते. कारण प्रतिबिंब केवळ स्थिर पाण्यातच दिसते. आपल्या मूळ स्वरुपाची अर्थात आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी मनाला बुद्धीच्या आधीन करून स्थिर केले पाहिजे. स्थिर झालेल्या मनातच आत्म्याचे प्रतिबिंब दिसू शकेल व बृहदारण्यक उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे ‘अहं ब्रह्मास्मि’ची प्रचिती येईल.