मनसस्तु परा बुद्धिः

काल टीव्ही वर एक जाहिरात पाहत होतो. लहान मुलांच्या बुद्धीचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होत असतो व हा विकास अधिक चांगल्या रीतीने होण्यासाठी ० ते ५ वयोगटातील मुलांना दुधात अमुक पावडर घालून द्यावी, असे काहीतरी सांगणारी ती जाहिरात होती. त्यावरून मला आठवलं कि मलासुद्धा आई लहानपणी बदाम वगैरे तत्सम पदार्थ खायला देत असे, त्यामुळे मीही बुद्धिमान होईन, अशी तिची वेडी आशा होती. या पदार्थांमुळे मा‍झ्या बुद्धीचा विकास झाला कि नाही हा संशोधनाचा विषय आहे, परंतु मला विविध पदार्थ खाण्याची आवड लागली एवढं खरं! एकंदरीत काय तर आपल्याकडे ‘बुद्धी’ या गोष्टीला अनन्यसाधारण महत्व आहे. अशा या ‘मान्यवर’ दर्जा प्राप्त झालेल्या बुद्धीचे कार्य कोणते? जर बुद्धी निर्णय घेत असेल असे मानले, तर काही लोक ‘मनाने निर्णय घेतात’ म्हणजे नेमके काय करतात? बुद्धीचे काही प्रकार आहेत का? मा‍झ्या अत्यंत अल्प बुद्धीला पडलेल्या या प्रश्नांचा मागोवा घेणारा हा संक्षिप्त लेख!

आदि शं‍कराचार्यांनी सांगितलेल्या अंतःकरण-चतुष्टय मधील ‘मन’ या इंद्रियाचा विचार आपण मागील लेखात केला. आवड-निवड ठरविणाऱ्या व वकीलाप्रमाणे वागणाऱ्या मनाचे कार्य आपण पहिले. याच अंतःकरण चतुष्टय मधील दुसरे महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे ‘बुद्धी’. हे इंद्रिय मनाहून श्रेष्ठ दर्जाचे मानले गेले आहे. अनेकविध अध्यात्मिक ग्रंथांत बुद्धीची श्रेष्ठता ग्रंथकारांनी विशद केली आहे. भगवद्गीतेच्या तिसर्‍या अध्यायातील ४२व्या श्लोकात दिलेल्या क्रमवारीनुसार बुद्धी ही मन व इंद्रिये याहून श्रेष्ठ दर्जाची व अधिक सूक्ष्म आहे. महाभारतातील शांतिपर्वातील एका श्लोकात ‘व्यवसायत्मिका बुद्धिः’ असे बुद्धीचे वर्णन आढळते. यावरून बुद्धीचे कार्य स्पष्ट होते. श्लोकात म्हटल्याप्रमाणे बुद्धी हे व्यवसाय करणारे इंद्रिय आहे. व्यवसाय या शब्दाचा येथील अर्थ म्हणजे सारासार विचार व निर्णय. बुद्धीकडे निवडानिवड करण्याची शक्ती आहे. म्हणजेच काय, तर एखादे कार्य करावे कि करू नये याचा निर्णय बुद्धी करते.

बुद्धीचे काम न्यायाधीशासारखे आहे. ज्याप्रमाणे वकिलाने मांडलेल्या बाजू ऐकून घेऊन त्यावर योग्य निर्णय सुनावण्याचे कार्य न्यायाधीश करतात, अगदी तसेच मनाने मांडलेल्या विषयांवर सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे काम बुद्धी करते. उदाहरणार्थ, आपण एखाद्या मोबाईलच्या दुकानात जातो, तिथे स्वस्त-महाग असे अनेक प्रकारचे मोबाईल ठेवलेले असतात. त्यातील काही मोबाईल आपल्या मनास भावतात. मग आपले मन त्याची बाजू बुद्धीसमोर मांडते व त्यावर सारासार विचार करून अखेरीस कोणता मोबाईल घ्यावा, याचा निर्णय बुद्धी करते. म्हणजेच काय, तर कोणत्याही गोष्टीबाबत निर्णय घेण्याचे कार्य बुद्धीचे आहे.

आपल्याकडे काही जण असं म्हणताना दिसतात कि, ‘हम दिमागसे नाही, दिलसे फैसला करते है’. अशा प्रकारच्या विधानातून काही प्रश्न निर्माण होतात. निर्णय घेणे बुद्धीचे काम असल्यास मनाने निर्णय घेणे म्हणजे काय? बुद्धीने निर्णय घेणे म्हणजे भावना-शून्य होऊन निर्णय घेणे, असे आहे का? या प्रश्नमालिकेच्या उत्तरासाठी आपण एका तराजूची कल्पना करूयात. तराजूच्या एका पारड्यात आपली इंद्रिये व त्यांचे विषय आहेत, तर दुसर्‍या पारड्यात बुद्धी आहे. या तराजूच्या मध्यभागी मन विराजमान आहे. मनाचे दान ज्या पारड्यात पडेल ते पारडे जड होईल व त्याची आपल्यावर सत्ता प्रस्थापित होईल. जेव्हा मन आपले दान बुद्धीच्या पारड्यात टाकते, तेव्हा आपण अधिक विवेकनिष्ठ होतो. यामध्ये भावनांना स्थान नसते, हा केवळ गैरसमज आहे. भावना महत्वाच्या आहेतच, परंतु त्यांच्या सर्वस्वी आहारी न जाता सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरून आपण निर्णय घेतो. परंतु, जेव्हा मनाचे दान इंद्रिय व विषयांच्या पारड्यात पडते, तेव्हा साहजिकच आपण विषयाधीन होतो. आपल्या बुद्धीवर विषयांची सत्ता प्रस्थापित होते. आपला सारासार विचार क्षीण होतो. इंद्रिय-विषय व त्यातून मनात निर्माण होणार्‍या भावना यांची आपल्यावर सत्ता प्रस्थापित होते. अशा वेळी आपण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो व म्हणतो कि ‘हम दिलसे फैसला करते है!’.

भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात श्रीकृष्णाने बुद्धीचे प्रकार वर्णिले आहेत. बुद्धीचे मुख्यतः तीन प्रकार पडतात: सात्त्विक बुद्धी, राजसिक बुद्धी व तामसिक बुद्धी. ज्या बुद्धीला योग्य-अयोग्य कळते, कर्तव्य व नीतीधर्म कळतो, अशी बुद्धी म्हणजे सात्त्विक बुद्धी. जी बुद्धी धर्म-अधर्म, कर्तव्य-अकर्तव्य योग्य रीतीने जाणत नाही, ती राजसिक बुद्धी. जी बुद्धी अधर्मालाच ‘धर्म’ मानते व विपरीत निर्णय करते, ती तामसिक बुद्धी. उदाहरणार्थ, महाभारतात दुर्योधनाची बुद्धी तामसिक होती, त्यामुळेच अधर्म करण्यातच त्याला पुरूषार्थ वाटला. कुरुक्षेत्र युद्धापूर्वी अर्जुनाची बुद्धी राजसिक होती, त्यामुळे त्याला योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म याचा विसर पडला व त्याने शस्त्रत्याग केला. परंतु, श्रीकृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुनाला स्वधर्माची जाणीव झाली व तो युद्धास तयार झाला, ही झाली सात्त्विक बुद्धी.

कठोपनिषदामध्ये उद्दालक ऋषींचा सुपुत्र नचिकेत व यमदेव यांच्यातील संवाद आहे. यामध्ये यमदेव नचिकेताला ब्रह्मविद्येचा उपदेश करतात. या रंजक संवादामध्ये यमदेवांनी मानवी शरीराला रथाची उपमा दिली आहे. इंद्रिये म्हणजे या रथाचे अश्व. ती स्वाभाविकपणे विषयांकडे धाव घेत असतात. या घोड्यांना लगाम आहे तो मनाचा. मनच या इंद्रियांना आवरू शकते, त्यांना आवर घालू शकते. या रथाचा सारथी म्हणजे बुद्धी. मनाचा लगाम बुद्धीच्या ताब्यात आहे. म्हणजेच मन हे बुद्धीच्या आधीन आहे व इंद्रिये मनाच्या आधीन आहेत. बुद्धी या शरीररथाचे सारथ्य करते व रथाला योग्य दिशादर्शन करते. या रथाचा स्वामी आहे आत्मा (अध्यात्मिक परिभाषेत त्याला ‘जीवात्मा’ अशी संज्ञा आहे). शरीररूपी रथातून त्याचा स्वामी या संसारात प्रवास करत आहे. रथाचा मार्ग कोणता व कसा असावा, हे सारथी ठरवतो. सारथीने लगाम घट्ट पकडून रथाच्या अश्वांना आपल्या काबूत ठेवले पाहिजे, तरच हा रथ योग्य मार्गाने प्रवास करील. अर्जुनाच्या रथाला श्रीकृष्ण स्वतः सारथी होते, म्हणून त्यांचा रथ निजधामाला पोचला. आपणही जर स्वतःला अर्जुनाच्या योग्यतेचे बनवले, तर कोण जाणे, आपल्याही रथावर भगवान स्वतः विराजमान होतील व आपला रथ पैलतटावर घेऊन जातील!

4 thoughts on “मनसस्तु परा बुद्धिः

  1. Very well structured as compared to the initial ones. Again language, examples are very simple and clear. And a small question, in 4th Para – are you trying to imply for those who take decisions using mind, the mind becomes the judge? That’s inconsistent with your analogy in 3rd Para where you implied intellect to be the judge.

    Liked by 1 person

  2. रंजक प्रश्नाबद्दल धन्यवाद अभिषेक..
    एक गोष्ट पुन्हा येथे नमूद करतो. मनाकडे निर्णयक्षमता नाही. मन निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेण्याचे काम फक्त आणि फक्त बुद्धीच करू शकते. वकिलाला निर्णय देण्याचा अधिकार नाही व केवळ न्यायाधीशच निर्णय घेऊ शकतो, तसेच मन आणि बुद्धी यांचे आहे.
    जी लोकं “आम्ही मनाने निर्णय घेतो” असे म्हणतात, त्यांच्या बाबतीत निर्णयप्रक्रियेत मनाचा सहभाग अधिक असतो. म्हणजेच, अशी लोकं भावनांना अधिक महत्व देऊन तर्कविचार गौण मानतात (Emotions are given priority over logical rationale). त्यामुळे बुद्धी मनाच्या आधीन होते व मनातील भावभावनांच्या प्रभावाखाली बुद्धी निर्णय घेते.
    वकील व न्यायाधीशाचं उदाहरण घेतलं तर, एखाद्या वकिलाचा न्यायाधीशावर इतका प्रभाव पडतो कि तो म्हणेल त्याप्रमाणे न्यायाधीश आपला निर्णय देतो. येथे निर्णय घेण्याचे काम न्यायाधीशानेच केले, परंतु वकिलाच्या आधीन होऊन केले.

    Like

  3. Ajinkya,
    Very nicely written article as usual.
    All your articles helps oneself to understand the concept very easily.

    Like

Leave a comment