कर्मात् कर्म उदच्यते

आज एक जुना मित्र अनेक वर्षांनी भेटला. एकमेकांची विचारपूस झाली. बोलताना त्याच्याकडून कळलं कि, काही महिन्यांपूर्वी त्याचे वडील अचानक गेले. वडि‍लांच्या अकाली जाण्याचा आईने धसका घेतला व आजारपण आलं. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अचानक याच्यावर आली. घरची परिस्थिती बेताची असल्याने पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून याला नोकरी धरावी लागली. हे सर्व ऐकल्यावर मी जरा त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो सहज म्हणून गेला, “अरे, हे सगळे माझ्या प्रारब्धाचे भोग आहेत. तू तरी काय करणार?” त्याच्या या वाक्याने मनात प्रश्नांचे अनेक तरंग निर्माण झाले. प्रारब्ध म्हणजे काय? प्रारब्ध भोग कसे निर्माण करते? प्रारब्धाच्या अनुषंगाने येणारे ‘संचित’ म्हणजे काय? यालाच ‘कर्मबंधन’ म्हणतात का? आणि हे जर बंधन असेल, तर त्यातून मुक्त होण्याचा मार्ग तो कोणता? हा लेख म्हणजे या प्रश्नांची उकल करण्याचा छोटासा प्रयत्न!

जन्मास आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म करणे अनिवार्य आहे, कर्म केल्याशिवाय कोणताही जीव क्षणभरही जिवंत राहू शकत नाही, असे भगवद्गीता सांगते. कर्म म्हणजे केवळ शारीरिक कर्म नव्हे, तर त्यात मानसिक कर्मांचासुद्धा समावेश होतो. समजा, आपण एका खोलीत डोळे मिटून स्तब्ध बसलो आहोत. तरीही आपल्या मनात असंख्य विचार सुरू असतात. अगदी मरणासन्न असलेल्या व्यक्तीच्या शरीराची हालचाल जरी थांबली असली, तरी श्वासोच्छवास थांबत नाही. म्हणजेच, कोणत्या तरी रूपाने मनुष्याचे कर्म सुरूच असते. जेव्हा एखादे कर्म घडते, तेव्हा त्याचे फळही निर्माण होते. यालाच कर्मफल असे म्हणतात. कर्मफल म्हणजे केलेल्या कर्माचा परिणाम. कर्माप्रमाणे त्याचा परिणामही अटळ असतो. परंतु, हे परिणाम कर्म घडल्यावर तात्काळ भोगावे लागतीलच असे नाही. काही कर्मफले तत्क्षणी भोगावे लागतात, तर काही बऱ्याच काळानी प्रकट होतात. केलेल्या कर्माचे फळ मनुष्यास कधी भोगावे लागणार, यानुसार त्याचे तीन प्रकार पडतात – प्रारब्ध, संचित व क्रियमाण.

मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो. त्या सर्व कर्मांचे परिणाम हळूहळू साठत जातात. ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलेंस वाढत जातो, अगदी तसेच, मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात. कर्मफलाच्या खात्यातील या बॅलेंसला ‘संचित’ असे म्हणतात. मनुष्य जसे जसे कर्म करत जातो, तसतसे त्या कर्मफलांचे रुपांतर संचितात होत जाते व त्याचा बॅलेंस वाढत जातो. भारतीय तत्त्वविचारानुसार, या संचितात मनुष्याची जन्मोजन्मीची कर्मे साठवलेली असतात. संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते. यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात. त्यामुळे कर्मफलांचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात. संचितापैकी ज्या कर्मांचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो, त्यास ‘प्रारब्ध’ असे म्हणतात. संचित म्हणजे कर्मफलांचा महासागर आहे, तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा. अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं, त्याला आपण लाटा म्हणतो. त्याप्रमाणे, संचितातील असंख्य कर्मफलांपैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात, त्यांस प्रारब्ध म्हणतात.

कर्माचे काही परिणाम असे असतात कि ते तत्क्षणीच भोगावे लागतात. त्यास ‘क्रियमाण’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, तापलेल्या तव्याला हात लावल्यास हात भाजतो. केलेल्या कर्माचे फल तिथल्या तिथे भोगावे लागते. हे झाले क्रियमाण. यासोबतच, संचिताच्या पेढीतील ज्या कर्मफलांचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमानकाळी भोगत असतो, त्याचाही समावेश क्रियमाणात होतो. संचित म्हणजे महासागर, प्रारब्ध म्हणजे लाटा व क्रियमाण म्हणजे किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या मनुष्याच्या पायाला त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी. थोडक्यात, संचित म्हणजे कर्मांचा भूतकाळ, प्रारब्ध म्हणजे वर्तमानकाळ, तर क्रियमाण म्हणजे चालू वर्तमानकाळ.

श्रीराम स्वतः विष्णूचे अवतार होते. सर्वशक्तिमान परमेश्वर होते. परंतु, मनुष्य जन्म घेतल्यावर त्यांनाही कर्मे व त्या अनुषंगाने येणारे कर्मफलांचे भोग सुटले नाहीत. १४ वर्षांचा वनवास, पत्नी वियोग अशी दुःखे त्यांच्याही वाट्याला आली. रामावतारात प्रभू श्रीरामांनी दुष्ट वालीचा वध केला. एका झाडाच्या आडून बाण मारून वालीस यमसदनी धाडले. या कर्माच्या संचिताचे फल भगवंतानी कृष्णावतारात भोगले. त्रेतायुगातील वालीने द्वापारयुगात ‘जरा’ नावाच्या पारध्याच्या रुपात जन्म घेतला. या जराच्या बाणाने भगवान श्रीकृष्णास मृत्यू आला. कर्मसंचिताचे भोग साक्षात भगवंतासही सुटले नाहीत, तिथे मनुष्याची काय कथा!

जन्म प्राप्त झाल्यावर मनुष्य असंख्य कर्मे करत असतो. त्या प्रत्येक कर्माचे रूपांतर संचित, प्रारब्ध किंवा क्रियमाण यामध्ये होते. परिणामी, तो आयुष्यभर नानाविध भोग भोगत राहतो. हे भोग कधी सुखद, तर कधी दु:खद ठरतात. यामुळे जीवनाविषयी लालसा निर्माण होते. आपल्या जीवनात अधिकाधिक सुखदायी भोग यावेत व दुःखद भोग पुन्हा अजिबात येऊ नये, यासाठी मनुष्य अविरत प्रयत्न करू लागतो. प्रयत्न म्हणजेच आणखी कर्मे करू लागतो. ही कर्मे संचितात जमा होतात. संचित भोगांना जन्म देते व भोग आणखी कर्मे करण्यास प्रवृत्त करतात. म्हणजेच एक कर्म दुसर्‍या कर्माला जन्म देते व कर्मांचे कधीही न संपणारे चक्र निर्माण होते. यालाच ‘कर्मबंधन’ म्हणतात. जोपर्यंत संचिताच्या पेढीतील बॅलेंस शून्य होत नाही, संचिताचे भोग भोगून संपत नाहीत, तोवर जीवात्मा जन्म घेत राहतो. आपल्या कर्मसंचितानुसार जीवात्मा पुन्हा जन्म घेतो, जन्म झाल्यावर कर्मे प्राप्त होतात व कर्म केल्याने पुन्हा संचित निर्माण होते. परिणामी, जीवात्मा जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकतो. आपण केलेले कर्मच आपल्याला जीवन-मरणाच्या बंधनात अडकवते.

जन्मास आलेल्या जीवाला कर्मांचा त्याग करणे अशक्य आहे. कर्माचा नाश करणे शक्य नसले, तरी कर्मबीजाचा नाश करता येऊ शकतो. प्रत्येक कर्मात संचित निर्माण करण्याची जी शक्ती असते, त्यास ‘कर्मबीज’ असे म्हणतात. कारण, या बीजामुळे एका कर्मापासून भविष्यात अन्य कर्म निर्माण होते. परंतु, जर कर्मातील संचित निर्माण करण्याची शक्ती नाहीशी केली, तर त्याचे रुपांतर संचितात होणार नाही. म्हणजेच, कर्मबीजाचा नाश झाल्यास कर्म केले तरी त्याचे रुपांतर संचितात होणार नाही. पर्यायाने, हळूहळू संचितातील भोग संपून जातील व त्यामुळे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून आपोआप सुटका होईल. कर्मबीज नाहीसे करण्याकरिता मात्र अत्यंत युक्तीपूर्वक कर्मे करावी लागतील. कर्मे करण्याची ही युक्ती म्हणजेच कर्मयोग. भगवद्गीतेचा प्रतिपाद्य विषय म्हणजे कर्मयोग. त्याचे विवेचन करताना लोकमान्य टिळकांनी त्यास कर्मयोगशास्त्र असे संबोधले आहे. कर्मयोग म्हणजे एक अथांग महासागर आहे. या महासागरात खोल बुडी मारणे, या लेखात शक्य नाही. कर्मयोग हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. त्यावर लवकरच लेखमाला प्रस्तुत करेन.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येतात कि, प्रामाणिक कष्ट करूनही यश मिळत नाही. याउलट कधी फार मेहनत न घेता सहज यश प्राप्त होतं. थोडक्यात, आपण केलेली कर्म आणि मिळणारे फळ यांचा हिशेब जुळत नाही. याचे कारण आपले संचित, प्रारब्ध व क्रियमाण. करत असणाऱ्या कर्मांमुळे त्यांच्या अदृश्य बंधनात आपण अडकले जातोय, हेच आपल्याला कळत नाही. या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे कर्मयोग. कर्मयोग जीवनात आत्मसात करून गीतेत म्हटल्याप्रमाणे ‘योगयुक्तः कुर्वन्नपि न लिप्यते’ (अर्थ: कर्मयोगी मनुष्य कर्म करूनही कर्मांनी लिप्त होत नाही) अशी अनुभूती सर्वांना येवो, हीच प्रार्थना!