कर्मात् कर्म उदच्यते – भाग २

कर्मात् कर्म उदच्यते’ या लेखात कर्मबंधन म्हणजे काय, संचित-प्रारब्ध-क्रियमाण याचा भेद कसा होतो, इत्यादीचे विवेचन आपण केले. हे विवेचन मुख्यत: तात्त्विक पातळीवरील होते. त्यावर अनेक वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आणि या कर्मबंधनाचा व्यावहारिक जीवनात कसा प्रभाव पडतो, अशी विचारणा केली. भारतीय तत्त्वज्ञान हे केवळ पुस्तकी नसून मानवाच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेले आहे. भारतीय तत्त्वज्ञान केवळ हिंदू किंवा भारतीय लोकांपुरते मर्यादित नसून वैश्विकतेचे भान जपणारे आहे. ते कोणत्याही एका विशिष्ट जातीच्या, पंथाच्या, संस्कृतीच्या किंवा देशाच्या व्यक्तीसाठी नसून समस्त मानव समाजाचे कल्याण इच्छिणारे आहे. हे तत्त्वज्ञान जितके एखाद्या श्रद्धाळू व्यक्तीला लागू पडते, अगदी तितकेच एखाद्या नास्तिक व्यक्तीसही लागू पडते. म्हणूनच, कर्मबंधन ही वरवर तात्त्विक भासणारी संकल्पना आपल्या दैनंदिन व्यावहारिक (practical life) जीवनात कशी लागू पडते, यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न!

कोणत्याही जीवाला जन्म प्राप्त झाल्यावर कर्म आपोआपच प्राप्त होते. कर्म या संकल्पनेत केवळ शारीरिकच नाही तर मानसिक कर्मांचाही समावेश होतो. एखादे कर्म केल्यानंतर त्याचे रूपांतर संचितात होते. हे संचित म्हणजे एखाद्या जीवाने आजवर केलेल्या सर्व कर्मांची साठवण. संचितानुसार सुखद अथवा दुःखद भोग मानवाच्या वाट्याला येतात. हे भोग एकदम येत नाहीत, तर क्रमाक्रमाने येतात. संचितातील जे भोग भोगण्यास प्रारंभ होतो, त्यांस ‘प्रारब्ध’ म्हणतात. तर काही कर्म करत असतानाच त्यांचे परिणाम प्रकट होतात, त्यांस ‘क्रियमाण’ म्हणतात. संचिताचे भोग संपेपर्यंत जीवाची जीवन-मरणाच्या फेर्‍यातून सुटका होत नाही व त्यास पुन:पुन्हा जन्म प्राप्त होतो. यालाच ‘कर्मबंधन’ म्हणतात. हे तात्विक विवेचन आपण मागील लेखात पहिले होते. आता कर्मबंधनाचा व्यावहारिक दृष्टीने विचार करूयात.

कर्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कर्माशिवाय जीवन नाही. प्रत्येक क्षणी मनुष्य नवनवीन कर्मे करीत असतो. काही कर्मे शारीरिक स्वरुपाची, तर काही बौद्धिक, तर काही मानसिक असतात. केलेले प्रत्येक कर्म त्याचे फल निर्माण करीत असते.  कर्मामुळे उत्पन्न झालेली फले कर्त्याच्या चित्तावर आपला ठसा उमटवतात. केलेले प्रत्येक कर्म आपला स्वतंत्र ठसा उमटवते. यास आपण ‘संस्कार’ असे म्हणू शकतो. हे संस्कार कर्त्यास पुढील कर्मे करण्यास प्रवृत्त करतात. संस्काराच्या प्रेरणेने केलेली कर्मे पुनश्च नवीन संस्कार कर्त्याच्या चित्तावर रेखाटतात व नवीन संस्कार नवीन कर्मांना प्रेरणा देतात. ही कर्मपरंपरा अविरत सुरू राहते. आपण करीत असलेली कर्मे आपल्या चित्तावर संस्कार कसे उमटवतात, त्यावर थोडा विचार करू.

कोणतेही कर्म करण्यास प्रेरणा लागते. जसे इंधनाशिवाय गाडी चालू शकत नाही, तसेच अंतस्थ प्रेरणेशिवाय कर्म घडू शकत नाही. एखादा उद्देश किंवा एखाद्या विशिष्ट फळाची अपेक्षा कर्मासाठी प्रेरक ठरते. उदाहरणार्थ, शाळेत असताना परीक्षेत चांगले गुण मिळावेत, म्हणून विद्यार्थी अभ्यास करतात. चांगले अर्थार्जन व्हावे व कुटुंबाला अधिकाधिक सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात, म्हणून नोकरदार वर्ग परिश्रम करतो. गुणांची कामना अधिकाधिक अभ्यास करण्यास व धनाची कामना अधिकाधिक परिश्रम करण्यास प्रेरक ठरतात. जशी गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात, तशीच कामना ही कर्माची जननी आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

प्रत्येक व्यक्ती मनात एखादी कामना करून कर्म करते. केलेले प्रत्येक कर्म परिणाम उत्पन्न करते. हे परिणाम दोन प्रकारचे असू शकतात – प्रिय अथवा अप्रिय. जर कर्माद्वारे कामना पूर्ण झाली, तर अर्थातच परिणाम प्रिय व कामना अपूर्ण राहिली, तर कर्माचा परिणाम अप्रिय ठरतो. कामनापूर्तीमुळे कर्त्याला कर्माच्या फळाशी संग जडतो. म्हणजेच, एकदा कामनापूर्ती झाल्यावर त्याची कामना वाढीस लागते. निरंतर वाढत जाणारी कामना पूर्ण करण्यासाठी तो पुनःपुन्हा कर्मे करू लागतो. उदा. सुरुवातीला नोकरी करून पैसे मिळाल्यावर धनाची प्राथमिक कामना पूर्ण होते व अधिकाधिक पैशाची इच्छा जोर धरू लागते. आधी दुचाकी असेल, तर मग चारचाकीची कामना उत्पन्न होते. अशी वाढत जाणारी कामना पूर्ण करण्यासाठी मनुष्य अधिकाधिक कर्मे करू लागतो. यावरून हे स्पष्ट होते कि, कर्माचे फळ प्रिय असल्यास कर्त्याला फळाशी संग जडतो व हा विषयसंग त्यास अधिकाधिक कर्मे करण्यास प्रवृत्त करतो. यालाच तात्त्विक भाषेत ‘राग’ असे म्हणतात.

प्रत्येक कर्माचे फळ प्रिय असतेच असे नाही. कधीकधी कर्म करूनही कामना पूर्ण होत नाही. पदरी अपयश पडते. अशा अप्रिय फळाचासुद्धा कर्त्याच्या चित्तावर सखोल परिणाम होतो. कामना अपूर्ण राहिल्याने मनात अतृत्पीची भावना निर्माण होते. ही अतृप्ती क्रोधाला जन्म देते. क्रोधामुळे स्मृतीभ्रंश होऊ शकतो. म्हणजेच, क्रोध अनावर झाल्याने आपल्याला काय करू व काय नको हे कळेनासे होते. याचा परिणाम आपल्या सदसद्विवेकबुद्धीवर होतो. योग्य-अयोग्य याचा निर्णय घेण्यास आपण असमर्थ ठरतो. परिणामी, असे अप्रिय फळ पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये, म्हणून आपण पुन्हा नवी कर्म करू लागतो. याला तात्त्विक भाषेत ‘द्वेष’ असे म्हणतात. मिळालेल्या फळाचा आपण द्वेष करतो व तसे फळ भविष्यात टाळण्यासाठी प्रयत्न करू लागतो. कर्माचे फळ प्रिय असल्यास ते पुन्हा मिळवण्यासाठी धडपड सुरू होते, याउलट येथे अप्रिय फळाची पुन्हा प्राप्ती होऊ नये, म्हणून पुन्हा धडपड सुरू होते. म्हणजेच, अप्रिय फळही मनुष्यास पुन:पुन्हा कर्मे करण्यास प्रवृत्त करते.

कर्म केल्यावर त्याचे फळ कोणतेही असो, ते मनुष्यास पुन्हा नवीन कर्मे करण्यास उद्युक्त करते, हे निश्चित. कर्मफल प्रिय असल्यास निर्माण होणारा ‘राग’ व अप्रिय असल्यास निर्माण होणारा ‘द्वेष’ पुढील कर्मास कारणीभूत ठरतो. वास्तविक, निसर्गाने मनुष्य प्राण्यास बुद्धीची अद्भुत देणगी दिली आहे. बुद्धी माणसाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. परंतु, कामनाप्रधान कर्मे केल्यामुळे निर्माण होणारे ‘राग’ व ‘द्वेष’ मनुष्याला अधिक कर्मे करण्यास प्रवृत्त करतात. ही कर्मे मुख्यत: प्रिय फळ अधिकाधिक प्रमाणात उपभोगण्यासाठी आणि अप्रिय फळ टाळण्यासाठीच असतात. परिणामी, मनुष्य कर्माच्या बाबतीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य गमावून बसतो व तो भौतिक कामनासुखांच्या आहारी जाऊन कर्माच्या चक्रात अडकतो.

अगदी दैनंदिन जीवनातीलच उदाहरण घ्यायचे झाल्यास कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणारा माणूस बढती, पगारवाढ, इत्यादी कामना ठेवून कष्ट करीत असतो. दिलेली टार्गेट कितीही कठीण वाटत असली, तरी ती पूर्ण करण्याची धडपड करीत असतो. या प्रयत्नांचे दोन परिणाम शक्य होऊ शकतात. ते म्हणजे, त्यास बढती मिळेल किंवा बढती मिळणार नाही. बढती मिळाली, तर त्याची स्वप्ने अधिक रुंदावतात. कामना वाढतात व पुन्हा तो दिवस-रात्र एक करून काम करतो. परंतु, जर चांगले काम करूनही बढती मिळाली नाही, तर त्याची चिडचिड होते, सद्सद्विवेक क्षीण होऊ लागतो. कामाच्या बाबतीत उदासीनता येते. यालाच प्रचलित भाषेत ‘डिप्रेशन’ म्हणतात! मग ही दु:ख परंपरा टाळण्यासाठी तो पुन्हा परिश्रम करू लागतो. एकूण काय, तर केलेल्या कामामुळे बढती मिळो अथवा न मिळो, पण त्याची ढोर मेहनत सुरूच राहते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या दोन्ही अवस्था त्यास सुखद किंवा समाधानकारक वाटत नाहीत. कारण इच्छा अपूर्ण राहिली तर साहजिकच मनास समाधान मिळत नाही. मात्र इच्छा पूर्ण झाली तरी त्यापेक्षा मोठ्या इच्छेकडे डोळे लागले असल्याने वर्तमान स्थितीत मनुष्य असमाधानीच राहतो. शाश्वत समाधान म्हणजे मुक्ती व असमाधान म्हणजेच बंधन. अर्थात, व्यावहारिक पातळीवरील कर्मबंधन!

‘कर्मात् कर्म उदच्यते’ म्हणजे कर्मातून कर्म निर्माण होते. व्यावहारिक जगात संचित, प्रारब्ध व क्रियमाण अगदी दृश्य स्वरुपात नसले, तरी कामनेच्या प्रेरणेने केलेली कर्मे आपल्याला या भौतिक जगात अडकवून ठेवतात. केलेलं प्रत्येक कर्म आपल्याला पुढील कर्म करण्यास भाग पाडते. ज्याप्रमाणे प्रोग्रॅम फीड केल्यावर यंत्र ठराविक काम करीत राहते, त्याप्रमाणे कर्माच्या या चक्रात अडकून आपण ‘ओटो-पायलट’ मोडवर कर्मे करीत राहतो. या कर्मबंधनातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे ‘कर्मयोग’. तो आत्मसात झाल्यास कर्मबंधन आपोआप गळून पडते. कर्मयोगाद्वारे मनुष्य या बंधनातून मुक्त होऊन स्वरुपाशी तादात्म्य पावतो. ‘कर्मात् कर्म उदच्यते’ पासून सुरू होणारा आपल्या सर्वांचा जीवन-प्रवास ‘पूर्णात् पूर्णमुदच्यते’ला येऊन संपन्न होवो, हीच प्रार्थना!