योग: कर्मसु कौशलम्

कर्मयोग लेखमाला – भाग १

कर्मबंधनावरील लेख (कर्मात् कर्म उदच्यते – भाग १भाग २) वाचून अनेक वाचकांनी ‘कर्मयोग’ या विषयावर लेख लिहिण्याची विनंती केली. परंतु, पीएचडीच्या कामाचा व्याप वाढल्याने ते शक्य झालं नाही. आता काही महिन्यांच्या स्वल्पविरामानंतर पुन्हा एकदा लिखाण सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कर्मयोग विषयाचा आवाका प्रचंड आहे. श्रीमद्भगवद्गीतेचा प्रमुख प्रतिपाद्य विषय म्हणजे कर्मयोग. त्यामुळे लोकमान्य टिळक ‘गीतारहस्य’ या ग्रंथाला ‘कर्मयोगशास्त्र’ असे संबोधतात. कर्मयोगासारखा अथांग विषय ब्लॉगच्या माध्यमातून मांडणे, म्हणजे आकाश चिमटीत पकडण्यासारखे आहे. कर्मयोगाचे संपूर्ण विवेचन केवळ एक लेखात करणे शक्य नाही. त्यामुळे लेखमालेच्या स्वरुपात कर्मयोग उलगडून सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. ‘कर्मयोग म्हणजे काय?’ या केवळ एकाच प्रश्नाचा विचार या लेखात आपण करणार आहोत. ही लेखमाला जसजशी पुढे जाईल, तसे आपण कर्मयोगाचे अधिक पैलू उलगडत जाऊ.

‘कर्मयोग’ या शब्दात दोन प्रमुख संज्ञा दडल्या आहेत – कर्म आणि योग. या प्रत्येक संज्ञेला विशिष्ट अर्थ आहे. तो समजून घेतल्यास कर्मयोगाची संकल्पना अधिक सोपी होईल. कर्म म्हणजे क्रिया, काम, कृती, कार्य, इत्यादी. आपल्या जीवनातील विविध क्रिया (श्वास घेणे, उठणे, बसणे, चालणे, खाणे, झोपणे, वगैरे), कामे (घरगुती कामे, ऑफिसमधील कामे, धंदा-व्यवसायाची कामे, इत्यादी), कृती (हसणे, रडणे, चिडणे, आदी) या सर्वांचा समावेश ‘कर्म’ या संकल्पनेत होतो. कर्म म्हणजे केवळ शारीरिक क्रिया नव्हेत. त्यात मानसिक कर्मांचाही समावेश होतो. आपल्या मनात सतत निरनिराळ्या गोष्टींचा विचार सुरू असतो. आपण चिडतो, रागवतो, प्रेम करतो, द्वेष करतो, अनेक विषयांचे मनन – चिंतन करतो, इत्यादी.. या सर्व मानसिक क्रियांचाही ‘कर्म’ या संज्ञेत अंतर्भाव होतो. संपूर्ण मानवी जीवन कर्माने व्याप्त आहे. असा एकही क्षण सापडणार नाही, ज्यात आपल्याकडून कर्म घडत नाही. अगदी झोपेतसुद्धा आपला श्वासोच्छवास सुरू असतो आणि मेंदूचे कार्य तर अव्याहत सुरूच असते. ही सर्व कर्मे मनुष्याच्या मृत्यूनंतरच थांबतात. त्यामुळे ‘कर्म’ हे मानवाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

‘योग’ म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाने विश्वाला दिलेली अनमोल देणगी. ‘योग’ हा शब्द ‘युज्’ या धातूपासून निर्माण झाला. त्याचा अर्थ ‘जोडणे, जुळवणे, एकत्र आणणे, एकत्रावस्थिती’ असा होतो. मग अध्यात्मातील योगात नक्की काय एकत्र येते? याचे उत्तर अगदी सोपे आहे. भारतीय अध्यात्मातील वेदांतविचार असे सांगतो, या संपूर्ण विश्वात चैतन्य (universal consciousness) भरलेलं आहे. त्याच चैतन्याचा अंश (individual consciousness) मानवी शरीरातही वास करतो. परंतु, शरीरात वसणाऱ्या चैतन्याचा प्रत्यय आपल्याला सहजासहजी येत नाही. कारण, त्या चैतन्यशक्तीवर अनेक प्रकारचे आवरण असते. आपल्या इच्छा, कामना, वासना, हव्यास आदींनी हे आवरण निर्माण होते. तैत्तरीय उपनिषद असे सांगते, मानवी शरीर हे पाच कोशांनी अर्थात पंचकोशांनी (अन्नमय , प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय) बनले आहे. यांमधील सर्वात सूक्ष्म असणारा आनंदमय कोश म्हणजेच सच्चिदानंदरुपी चैतन्य. उर्वरित चार कोशांना पार केल्यावरच चैतन्याची अनुभूती येते (self-transcendence). शरीर, मन, बुद्धी इत्यादीच्या पलीकडे  अन्य काहीतरी आहे, जे माझे खरे ‘स्व’-रूप (true self) आहे, अशी जाणीव निर्माण होते. खरा मी म्हणजे माझे शरीर नसून माझ्यात असेलेले चैतन्य हेच अंतिम सत्य आहे, अशी अनुभूती येते. आदि शंकराचार्य ‘स्व’रूपाचे वर्णन करताना सुप्रसिद्ध निर्वाणषटक स्तोत्रात म्हणतात, ‘शिवोऽहं शिवोऽहं’ (मी म्हणजे अविनाशी, अनंत ‘शिव’तत्त्व आहे). थोडक्यात, माझ्या हृदयातील चैतन्यशक्ती व विश्वातील चैतन्यशक्ती यांची एकत्रावस्थिती म्हणजे ‘योग’. सर्व काही ‘एक’ आहे, दुसरे (द्वैत) काहीच नाही, अशी अद्वैताची अनुभूती म्हणजे योगानुभूती.

ही योगस्थिती कशी साधायची? आपल्यासारखी सामान्य माणसं ही स्थिती प्राप्त करू शकतात का? या प्रश्नाचे स्पष्ट व ठळक उत्तर ‘हो’ असे आहे. योगस्थिती साध्य करण्यासाठी अध्यात्मशास्त्राने तीन प्रमुख मार्ग सुचवले आहेत – ज्ञान मार्ग (ज्ञानयोग), भक्ती मार्ग (भक्तियोग) व कर्म मार्ग (कर्मयोग). कुशाग्र बुद्धीच्या साधकांसाठी ज्ञानमार्ग सांगितला आहे. महाराष्ट्रातील थोर संतांनी ज्या मार्गाचा प्रचार व प्रसार केला, तो म्हणजे भक्ती मार्ग. गृहस्थाश्रमी राहून प्रपंच करणाऱ्या लोकांसाठी कर्मयोग सांगितला आहे. येथे विवेचनाचा प्रमुख विषय कर्मयोग असल्याने अन्य दोन मार्ग तूर्तास बाजूला ठेवू व यातील कर्मयोगाचा विचार करू.

लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, “कर्मयोग म्हणजे कर्म करण्याची विशेष युक्ती”. आपण करत असलेली दैनंदिन कर्मे युक्तीपूर्वक केल्यास ती कर्मे आपल्याला बांधून ठेवत नाहीत. श्रीमद्भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायातील ५०व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्’. अर्थात, ‘कर्मे करण्याचे हे कौशल्य (युक्ती) आत्मसात कर’. आपला असा गैरसमज होतो कि, कर्मयोग म्हणजे संन्यास किंवा काहीतरी वेगळे कार्य करावे लागते. परंतु, यात काही तथ्य नाही. कारण, श्रीकृष्णाने अर्जुनास ‘युद्धापासून निवृत्त हो व संन्यास घे’ असे मुळीच सांगितले नाही. किंबहुना, अर्जुनास युद्ध करण्यास प्रवृत्त करणे, हाच गीताकथनाचा मुख्य उद्देशच होता. युद्ध हेच अर्जुनाचे मुख्य कर्म होते. श्रीकृष्णाने त्या कर्मात किंचितही बदल केला नाही. याउलट, तेच कर्म कल्याणकारक होण्यासाठी एक विशेष युक्ती सांगितली. ही युक्ती किंवा कर्म करण्याचे विशेष कौशल्य म्हणजेच कर्मयोग. कर्मे तीच, फक्त ती करण्याची पद्धत मात्र वेगळी, ज्याद्वारे आपले कर्म अधिक निर्दोष होते व अध्यात्मिकदृष्ट्‍या कल्याणकारक होते.

कर्मयोग ‘निवृत्ती’कारक नसून ‘प्रवृत्ती’कारक आहे. कर्मापासून निवृत्त होण्यास न सांगता आपण करत असलेली कर्मे अधिक परिपूर्ण व कल्याणकारक करण्यासाठी कर्मयोग आपल्याला प्रवृत्त करतो. आपण ‘कोणते’ काम करतो यापेक्षा ते ‘कसे’ करतो, याला अधिक महत्व आहे. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत कोडींग करणारा आयटी प्रोफेशनल, प्राथमिक शाळेतील शिक्षक, शेतकरी, राजकीय पुढारी, बँकेचा व्यवस्थापक, कवी, लेखक, अभिनेता, महानगरपालिकेचा स्वच्छता दूत, कॉर्पोरेट उद्योजक, सीमेवरील तैनात सैनिक, इत्यादी, इत्यादी… ही यादी अमर्याद आहे. या यादीतील सर्वजण कर्मयोगाच्या अखत्यारीत येतात. गीतेनुसार सर्व प्रकारची कामे समान आहेत. त्यात उच्च-नीच असा भेदभाव मुळीच नाही. त्यामुळे, ‘मला याचा उपयोग नाही’ असे म्हणण्याची मुभा गीता कोणालाही देत नाही.

कर्मयोग अर्थात कर्म करण्याचे कौशल्य म्हणजे काय? वेगळे कर्म करायचे नाही, मात्र वेगळ्या पद्धतीने करायचे म्हणजे नेमके काय? मी कॉर्पोरेट जॉब करतो, तर मला हे कौशल्य आत्मसात करता येईल का? मी अत्यंत व्यवहारी (practical) माणूस आहे. मला कर्मयोग आत्मसात करून मला काय मिळणार आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांचा मागोवा लेखमालेतील पुढील लेखातून आपण घेणार आहोत. तोपर्यंत, ‘मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, त्यात कर्मयोगाचा अवलंब करणे मला शक्य आहे’, इतके तरी मनात निश्चित करुया!

ता.क. – कर्मयोगावरील तुमचे प्रश्न / शंका मला अवश्य पाठवा. लेखमालेतून त्यांची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.

6 thoughts on “योग: कर्मसु कौशलम्

  1. उत्तम विषय…
    पुढील भागांची आतुरतेने वाट बघत आहे….

    Liked by 1 person

  2. अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण केले आहे.खूप खूप धन्यवाद.
    या सिद्धांताचा उपयोग शवासना मध्ये कसा करू शकतो याचे विश्लेषण करावे हि विनंती

    Liked by 1 person

  3. “या सिद्धांताचा उपयोग शवासना मध्ये कसा करू शकतो” याचा नेमका अर्थ कळला नाही. क्षमस्व..

    Like

  4. कर्मयोगावरील लेखमाला बरेच दिवसात आली नाही. कृपया चालूच ठेवा, वाचताना खूप
    चांगले वाटते आणि ज्ञानात भर पडते. आभारी आहे.

    Like

Leave a comment