विज्ञान आणि अध्यात्म

सध्याचं युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे. माहिती तंत्रज्ञानातील अफाट प्रगतीमुळे मनुष्याचे जीवनमान पूर्णपणे बदलून गेले आहे. दैनंदिन जीवनात पदोपदी आपण विज्ञान – तंत्रज्ञानाचा अनुभव घेतोय. आधुनिक शास्त्रज्ञांनी तर मनुष्याला अज्ञात असणाऱ्या असंख्य गोष्टींवर अविरत संशोधन करून निसर्गातील अनेक अनाकलनीय पैलूंवर प्रकाश टाकला आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता मानवाला अवगत झाल्या आहेत. मानवीय जनुकांच्या निर्मितीपासून ते अगदी अथांग पसरलेल्या अवकाशातील असंख्य आकाशगंगा, इत्यादी असंख्य प्रश्नांची उकल आपल्याला होऊ लागली आहे. एकूणच मानव समाजाच्या ज्ञानकक्षा प्रचंड रुंदावल्या आहेत. या रुंदावलेल्या कक्षेत अध्यात्म नेमके कुठे बसते? विज्ञानाच्या कसोटीवर त्याचे परीक्षण आपल्याला करता येईल का?

बुद्धी व मन ही मानवाला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे, ज्याच्या जोरावर माणसाने आपली प्रगती साधली आहे. सभोवताली सृष्टीत घडणाऱ्या विविध घटनांचा अर्थबोध करून घेण्याची धडपड तो करत सदैव असतो. याच बुद्धीच्या जोरावर मानवाने ‘असे का होते?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रारंभ केला आणि त्यातून विविध शास्त्रांचा उगम झाला. ज्ञानशाखांची निर्मिती आणि विकास झाला. अनेक गोष्टींबाबत तत्त्वचिंतन सुरु झाले, ज्यातून निरनिराळ्या तत्त्वविचारांचा उदय झाला. सभोवतालच्या सृष्टीत घडणाऱ्या घटनांचा सूक्ष्म विचार होऊ लागला आणि त्यातून अनेक रहस्य उलगडली गेली. ‘असे का होते?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रक्रियेलाच आपण ‘विवेचन’ असे म्हणतो. भारतीय तत्त्वविचारानुसार या विवेचनाचे मुख्यतः तीन स्तर होतात. त्याची माहिती घेतल्यास आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील संबंध लक्षात येण्यास मदत होईल. हे तीन स्तर समजून घेण्यासाठी एक नमुना घेऊया. रोज सकाळी आकाशात सूर्य उगवतो आणि तो आपल्याला प्रकाश, उष्णता देतो. या प्रक्रियेचे आपण तीन प्रकारे विवेचन करण्याचा प्रयत्न करूयात.

  1. आधिभौतिक विवेचन: भौतिक सृष्टीतील पदार्थ आपल्या इंद्रियांना जसे अवगत होतात, त्यानुसार त्यांचा विचार अथवा अभ्यास करणे म्हणजे आधिभौतिक विवेचन. सूर्य आपल्याला डोळ्यांनी दिसतो. त्याच्या प्रकाश आपल्या डोळ्यांना, तर उष्णता त्वचेला कळते. संबंधित इंद्रियांना त्याची जाणीव झाल्यावर आपल्या विचार प्रक्रियेस प्रारंभ होतो. मग आपण सूर्याचा आकार, त्याचे वस्तुमान, तापमान, तेथे होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया, सूर्याचे आकाशातील स्थान, गती, पृथ्वीपासून अंतर, इत्यादी भौतिक घटकांचा अभ्यास करतो आणि ‘असे का’ याचे उत्तर मिळवतो. हे झाले आधिभौतिक विवेचन.
  2. अधिदैविक विवेचन: आपल्या इंद्रियांना अवगत होणाऱ्या वस्तूंच्या मुळशी एखादे अन्य तत्त्व असून ते भौतिकतेच्या पलीकडील आहे आणि एखादी देवता ते अचिंत्य तत्त्व संचालित करत असते, असे मानणे म्हणजे अधिदैविक विवेचन. सूर्य उगवतो, तो आपल्याला प्रकाश व उष्णता देतो याला सूर्याचे वस्तुमान, आकार, रासायनिक प्रक्रिया अशा भौतिक घटकांबरोबच त्याच्या पलीकडे असणारी एखादी अनाकलनीय शक्ती कार्यरत आहे, असा विचार करून त्या शक्तीला सूर्याला कार्यान्वित करणारी देवता मानणे, म्हणजे अधिदैविक विवेचन. म्हणूनच आपल्या संस्कृतीत सृष्टीतील विविध घटकांना देवतांचा मान दिला आहे व आपण त्यांची उपासना करतो.
  3. अध्यात्मिक विवेचन: जड सृष्टीत दिसणाऱ्या सर्व भिन्न भिन्न पदार्थांच्या ठायी एकच अचिंत्य शक्ती आहे, असे म्हणणे म्हणजे अध्यात्मिक विवेचन. अर्थात, आपल्याकडे रूढ असणारा वेद व उपनिषदातील विचार. सूर्य आपल्याला डोळ्यांनी दिसतो, त्याची उष्णता त्वचेला जाणवते. म्हणजेच काय, तर सूर्याचे अस्तित्त्व आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांमुळे कळते. परंतु, या इंद्रियांच्या पार अर्थात इंद्रियातीत असे एक तत्त्व असून हे तत्त्व सर्वत्र भरले आहे आणि हा इंद्रियांना भासणारा सूर्य व अन्य सृष्टी हे त्या तत्त्वाचेच एक रूप आहे, असा विचार करणे म्हणजे अध्यात्मिक विवेचन.

या तीन प्रकारच्या विवेचानांचा अभ्यास केल्यास आपल्याला पटकन लक्षात येईल कि, सुरुवातीला आपण ज्या विज्ञानाचा उल्लेख केला ते विज्ञान हे ‘आधिभौतिक विवेचन’ या स्तरावर कार्यान्वित होते. विज्ञानाच्या मदतीने आपण सृष्टीतील जड पदार्थांचा (आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना समजणारे पदार्थ म्हणजेच ‘जड पदार्थ’) अभ्यास करू शकतो. यासाठी मानवाने जी उपकरणे तयार केली तीसुद्धा त्याला ज्ञात होणाऱ्या पाच गुणांच्या (रूप, गंध, शब्द, रस, स्पर्श) आधारे तयार केली. अध्यात्मिक विवेचन मात्र इंद्रियातीत तत्त्वाचा विचार करते. त्यामुळे अशा तत्त्वाचे मोजमाप आधिभौतिक उपकरणांनी करणे शक्य नाही.

समजा, आपल्याला एखाद्या पदार्थाचे वजन मोजायचे आहे. त्याकरिता आपल्याला तापमापक (thermometer) वापरून चालणार नाही, कारण वस्तूचे वजन मोजण्याची क्षमता तापमापक या उपकरणात नाही. वजन मोजण्यासाठी आपल्याला वजनकाट्याचीच गरज भासणार. त्याचबरोबर, तापमापकाने वजन मोजता येत नाही, म्हणजे वजन हे तत्त्व अस्तित्त्वातच नाही, असे मुळीच म्हणता येणर नाही. कारण दोष तत्त्वाचा नसून ते अभ्यासण्यासाठी वापरलेल्या साधनाचा आहे. अध्यात्मिक तत्त्वे वैज्ञानिक उपकरणांनी तपासून पाहणे, म्हणजे तापमापकाने वस्तूचे वजन मोजण्याचा प्रयत्न केल्यासारखेच आहे. विज्ञान आणि अध्यात्म या दोन वेगळ्या मिती (dimensions) आहेत. वैज्ञानिक उपकरणांनी अध्यात्माचे मोजमाप शक्य नाही, आणि ‘मोजता येत नाही’ म्हणून त्याचे अस्तित्त्व नाकारणे तर्कसंगत ठरणार नाही. विज्ञान हे इंद्रियांच्या अनुभवावर, तर अध्यात्म हे इंद्रियातीत अनुभूतीवर सिद्ध होते.

जाता जाता आणखी एक छोटासा विचार. भगवद्गीतेत ज्ञान आणि विज्ञान यांची सुंदर व्याख्या आढळते. जड सृष्टीतील नानाविध पदार्थांच्या मुळाशी एकच अव्यक्त परम तत्त्व (परमात्मा) आहे, असे ज्याने समजते ते ‘ज्ञान’. तर, या एकाच मूलभूत तत्त्वापासून सृष्टीतील अनेक भिन्न भिन्न पदार्थांची निर्मिती कशी झाली, असे ज्याने समजते, ते म्हणजे ‘विज्ञान’ (उदा: भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, इत्यादी). म्हणजेच आपण एक मध्यबिंदू आहोत. एकात्मतेकडून भिन्नतेकडे प्रवास केल्यास आपण वैज्ञानिक प्रगती साधू शकतो. त्याउलट भिन्नतेकडून एकात्मतेकडे प्रवास केल्यास अध्यात्मिक प्रगती साधू शकतो. विज्ञान मनुष्याला बहिर्मुख (extrovert), तर अध्यात्म अंतर्मुख (introvert) बनवते.

वैज्ञानिक प्रगतीमुळे बदलेल्या जीवनशैलीचे विपरीत परिणाम हळूहळू दृश्यरूप होत आहेत. जीवनात अस्थैर्य वाढीस लागले आहे. अशा समयी आपण कोणती वाट निवडायची आणि प्रगती साधायची, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणे, हीच खरी काळाची गरज बनली आहे.

2 thoughts on “विज्ञान आणि अध्यात्म

  1. जड सृष्टीतील नानाविध पदार्थांच्या मुळाशी एकच अव्यक्त परम तत्त्व (परमात्मा) आहे, असे ज्याने समजते ते ‘ज्ञान’. तर, या एकाच मूलभूत तत्त्वापासून सृष्टीतील अनेक भिन्न भिन्न पदार्थांची निर्मिती कशी झाली, असे ज्याने समजते, ते म्हणजे ‘विज्ञान’…… khup soppi vyakhya milali… thank you

    Liked by 1 person

Leave a comment