योग : आत्मोन्नतीचा राजमार्ग

एकदा एका मित्राशी गप्पा सुरू होत्या. प्रचंड वाचन व अत्यंत अभ्यासू असणारा हा मित्र बोलताना असं म्हणाला कि, “भारतीय तत्त्वज्ञान मला निराशावादी वाटतं. महाभारत वाचलं तर पदोपदी जीवनातील शोकांतिका जाणवत राहते. जीवनात कोणतंही काम केलं, तरी त्याचं बंधनात रुपांतर होतं, असे आपले अध्यात्म सांगते. तर मग, आपले जीवन बंधनच नाही का?” त्याचं हे अभ्यासपूर्ण बोलणं साहजिकच विचार करायला प्रवृत्त करणारं होतं. जन्म झाल्यावर कर्म करणं अनिवार्य असेल व कर्म केल्यावर जर बंधन निर्माण होत असेल, तर या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? हा मार्ग व्यवहार्य आहे कि केवळ तात्त्विक आहे? दैनंदिन जीवनात सर्वसामान्य व्यक्ती त्या मार्गाचे अनुसरण करू शकतात का? अशा अनेक प्रश्नांना समर्पक उत्तर देणारी भारतीय अध्यात्मातील संकल्पना म्हणजे ‘योग’.

योग ही भारतीय संस्कृतीने जागतिक संस्कृतीला दिलेली एक अनमोल देणगी आहे. भारताच्या पुढाकाराने संपूर्ण विश्व २१ जूनला जागतिक योग दिवस साजरा करतं. योग म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर योगासने किंवा प्राणायाम हे प्रकार येतात. परंतु, योग ही संकल्पना सर्वार्थाने खूप व्यापक आहे. ‘योग’ हा शब्द संस्कृत धातू ‘युज्’वरून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ – जोडणे, जुळवणे किंवा एकत्रावस्थिती. ही जोडणी किंवा एकीकरण नेमके कसले आहे? सर्वप्रथम आपण त्याचा विचार करूयात.

आपले अध्यात्म सांगते कि, या समस्त विश्वाची परम शक्ती प्रत्येक जीवात वास करते. विविध उपनिषदे एका सुरात कथन करतात कि, प्रत्येक मनुष्याच्या हृदयरुपी गुहेत परमात्मा निवास करतो. परंतु, त्यावर जड देहाचे आवरण असल्याने आपल्याला त्याची अनुभूती येत नाही व आपण स्वतःला त्याच्यापासून काहीतरी निराळे समजतो. मानवी शरीराची इंद्रिये, त्यांच्या वासना, इत्यादीमुळे आपल्याला स्वतःच्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो. अद्वैत वेदांत विचारानुसार, आपल्या हृदयातील परमात्माच चराचरात व्यापला आहे. परंतु, ‘स्व’रूपाचा विसर पडल्यामुळे आपण ती अनुभूती घेऊ शकत नाही. ‘योग’ म्हणजे आपल्या हृदयातील व चराचरातील व्याप्त परमात्मा यांची एकत्रावस्थिती. ‘मी शरीर नसून परम तत्त्व आहे व ते अनादि, अनंत, सर्वव्यापी आहे’ अशी अनुभूती म्हणजे योग. इंग्रजीमध्ये एक छान शब्द आहे ‘self-transcendence’. त्याचा अर्थ शरीराची मर्यादा ओलांडून अध्यात्मिक ‘स्व’रुपाची अनुभूती होणे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, योग म्हणजे आपल्या शरीराच्या मर्यादा पार करून हृदयात वसलेल्या व या सृष्टीत व्यापलेल्या देवाशी एकरूप होणे.

योगपूर्ण अनुभूतीचे वर्णन विविध संतांनी केले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘अणुरेणुया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ गिळुनि सांडिले कलेवर । भवभ्रमाचा आकार ॥

योगाची एकत्रावस्थिती वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, ‘माझे स्वरूप अणुरेणु इतके सूक्ष्मात सूक्ष्म ते आकाशही व्यापून जाईल इतके अनंत आहे. अर्थात सर्वव्यापी आहे. माझे शरीर म्हणजेच मी असे वाटणारा भ्रम आता गळून त्यापलीकडे मी गेलो आहे.’ आद्य शंकराचार्यसुद्धा योगस्थितीचे नेमके असेच वर्णन करतात – ‘अहं आकाशवत्सर्वं बहिरन्तर्गतोऽच्युतः’ (आकाशाप्रमाणे मी सर्वत्र अंतर्बाह्य व्याप्त आहे) !

योगपूर्ण अनुभूती घेण्यासाठी भगवद्गीतेत तीन प्रमुख मार्ग सांगितले आहेत – ज्ञान योग, कर्म योग व भक्ती योग. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार यातील योग्य मार्ग निवडू शकते. जाणकारांच्या मते, ज्ञान मार्ग हा सर्वात कठीण मार्ग आहे. यामध्ये, साधक अध्यात्मिक तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्यावर सखोल चिंतन करतो. जीव, जीवात्मा, जगत, परमात्मा, सृष्टीची उत्पत्ति, इत्यादी विषयांच्या दीर्घ चिंतनातून व ध्यान, एकाग्रतेतून साधकाला ‘स्व’रूपाचे  ज्ञान प्राप्त होते. कर्म योग म्हणजे दैनंदिन कर्म विशिष्ट प्रकारे केल्यास त्या कर्मांचे बंधन न होता कर्त्याची अध्यात्मिक प्रगती होते आणि त्यातून स्वतःचे व समाजाचे कल्याण होते. या तीन मार्गांतील सर्वात सुलभ मार्ग म्हणजे भक्ती योग. आपल्या इष्ट देवतेची निस्सीम भक्ती व नामस्मरण केल्यास भक्ताला परमेश्वराची अनुभूती होते. सर्व संतांनी आपल्या उपदेशातून भक्तीमार्ग व त्याची महती सर्वसामान्यांना पटवून दिली आहे. योगी अरविंद म्हणतात, ‘प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, स्वभाव भिन्न आहे. कोणी तासंतास एकाग्र बसून ध्यान करेल, तर कोणी भगवंताच्या भक्तीत रममाण होईल. एकच औषध सर्वांना लागू पडेलच असे नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, ज्यावेळी त्याला आकस्मिक प्रकाशाची अनुभूती येते व अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग गवसतो. तो योग्य क्षण ओळखून प्रत्येकाने आपला अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आत्मसात करायला हवा.’

ज्ञान योग, भक्ती योग व कर्म योग यातील प्रत्येक योग मार्ग स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. हा लेख म्हणजे केवळ त्यांची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न आहे. हे तीनही मार्ग केवळ तात्त्विक स्वरूपाचे नसून प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार दैनंदिन जीवनात सहज आत्मसात करता येऊ शकतात. फक्त त्यासाठी दृढ निश्चय करण्याची आवश्यकता आहे. श्वेताश्वेतारोपनिषदातील एक उक्ती आहे, जिचा स्वामी विवेकानंदानी पुनरुच्चार केला. ‘वयं अमृतस्य पुत्राः’ – आपण सर्व या अमृत्स्वरूपी परमात्म्याचेच अंश आहोत. योगाभ्यासाने आपल्या हृदयात दडलेल्या अमृतानंदमयी परमात्म्याची आपणांस अनुभूती होवो, हीच प्रार्थना!